निरंजना न्यूज नेटवर्क
हायवे लगत शेतामध्ये मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
बातमी (सविस्तर):
उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सातारा ते पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडच्या बाजूच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, उडतारे गावाजवळील हॉटेल महालक्ष्मी परिसरातील ‘बेल’ नावाच्या शिवारात हा प्रकार घडला. मृत इसम हा अंदाजे ४५ वर्षे वयाचा असून, तो पुरुष जातीचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी उडतारे गावचे पोलीस पाटील यांनी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी फिर्याद दाखल केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जी. शिंदे हे करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.











