* उडतरेच्या ग्रामसभेत प्रवीण बाबर यांच्याविषयी असंतोष*


निरंजना न्यूज नेटवर्क

उडतरे, दि. २८ (प्रतिनिधी)-
उडतरे येथील उत्तरा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रवीण बाबर यांच्याबद्दलचा ग्रामस्थांचा असंतोष उडतरे येथील आज झालेल्या विशेष ग्रामसभेत बाहेर पडला. गावच्या मालकीच्या वैकुठ रथासाठी निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून प्रवीण बाबर पैसे घेतात असा आरोप करून ग्रामस्थांनी जेष्ठ नागरिक संघटनेच्या मालकीच्या असणाऱ्या खुर्च्या सुद्धा ते भाड्याने देतात असा आरोप केला.
उडतरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये बोलाविलेल्या विशेष सर्वसाधारण ग्रामसभेत आज उडतरे गावच्या ज्येष्ठ नागरिकांनी तयार केलेल्या वैकुंठरथाचा आणि खुर्च्यांचा विषय चांगलाच गाजला. या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाने स्वखर्चातून तयार केलेल्या वैकुंठ रथाचे पैसे प्रवीण बाबर गावातील मृताच्या कुटुंबीयांकडून घेतात, असा आरोप ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, रथाचे प्राथमिक वर्गणीदार शंकरराव पवार (पाटील) यांनी केला. शंकरराव पवार यांनी प्रवीण बाबर यांच्यावर केलेले आरोप ऐकून सर्वच गावकरी प्रचंड संतापले. शंकरराव पवार यांच्यासोबत गावातील इतर मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनीही प्रवीण बाबर यांच्यावर हेच आरोप केले. यासंदर्भात प्रवीण बाबर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या ग्रामस्थांनी केली. याशिवाय ज्येष्ठ नागरिक संघाने खरेदी केलेल्या खुर्च्याही भाड्याने देऊन त्याचेही पैसे प्रवीण बाबर उकळत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केला. ग्रामसभेदरम्यान अनेक ग्रामस्थांनी प्रवीण बाबर यांच्याबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित करत संघाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी सुविधा उपलब्ध व्हावी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही वर्षांपूर्वी गावातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करून वैकुंठ रथ तयार करण्यात आला होता. वैकुंठ रथ ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असावी, गावकऱ्यांकडून जमा झालेल्या निधीचा तपशील सार्वजनिक करावा तसेच संघाच्या मालमत्तेचा वापर कोणत्या निकषांवर केला जातो याची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. या प्रकरणाची चौकशी करुन वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर आणावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली. याप्रसंगी सरपंच सौ अर्चना पवार, उपसरपंच प्रकाश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि तुकाराम पवार, सुरेश पवार, माजी उपसरपंच मोहन पवार, विलास बाबर, प्रदीप बाबर, मारुती पवार, सचिन पवार, रमेश पवार, राहुल शिंदे, आशा सेविका आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!