* उडतारे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती; ग्रामस्थांचा संताप*


निरंजना न्यूज नेटवर्क

उडतारे येथील ग्रामपंचायतीच्या आयोजित ग्रामसभेमध्ये महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेला तलाठी तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे गावातील विविध प्रश्नांवर चर्चा होऊनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र संबंधित अधिकारी गैरहजर असल्याने त्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

“ग्रामसभा ही लोकांच्या समस्या मांडण्याचे आणि त्यावर तोडगा काढण्याचे व्यासपीठ असते. मात्र जबाबदार अधिकारीच अनुपस्थित राहिल्यास ग्रामसभेचा उपयोग काय?” असा सवाल अनेक ग्रामस्थांनी केला. काहींनी वारंवार होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली.

यावेळी ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित नागरिकांमध्येही यावर चर्चा झाली. पुढील ग्रामसभांना संबंधित विभागांचे अधिकारी अनिवार्यपणे उपस्थित राहिले नाहीत तर अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तत्काळ निलंबनासाठी अर्ज येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

 

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामसभेत प्रश्न अनुत्तरित; कायमस्वरूपी तलाठी नियुक्तीची ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी यावेळी तलाठी पदाबाबतही प्रश्न उपस्थित केले. उडतारेचे नियमित तलाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप नवीन तलाठीची नियुक्ती करण्यात आलेली नसून सध्या अतिरिक्त कार्यभारावर कामकाज सुरू आहे. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित राहत असून ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसभेला तलाठी उपस्थित नसल्याने या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. गावासाठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!