वाघोलीत बिबट्याचा धुमाकूळ; सहा शेळ्या ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावर


निरंजना न्यूज नेटवर्क 

भुईंज प्रतिनिधी : सचिन इथापे.

वाघोली ता . कोरेगाव येथे गावठाणापासून अगदी जवळ असलेल्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून सहा शेळ्या ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि. २ जून) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघोली येथील शेतकरी संजय भोईटे यांच्या वाघोली-विद्यानगर मार्गालगत असलेल्या गोठ्यात सहा शेळ्या व एक म्हैस बांधलेली होती. बुधवारी सकाळी संजय भोईटे हे गोठ्यात गेले असता सर्व सहा शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. शेळ्यांवरील जखमांवरून हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केला असावा, असे सांगितले जात आहे. एका रात्रीत सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याने शेतकरी भोईटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या सुरेखा जगदाळे तसेच वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

वाघोली व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतकरी व ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

: वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

वाघोली परिसरात बिबट्याचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही स्थानिकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, या भागात वन विभागाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गावठाणालगतच्या गोठ्यात घुसून सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याच्या घटनेनंतर “या भागात वनविभाग अकार्यक्षम ठरत असल्याची चर्चा” ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावणे, नियमित गस्त वाढविणे व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे याबाबत अधिक ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

 


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!