उडतरे दि : सातारा तालुक्यातील मर्ढे गावावर काळाने घाला घातला असून आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेत दोन होतकरू युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. कमी वयात आपल्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने सर्वांची मने जिंकणारे उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) यांच्या अकाली जाण्याने मर्ढे गाव सुन्न झाले आहे.
आसगाव व मर्ढे येथील आठ युवक सहलीसाठी गेले होते. रविवारी (दि. 24 मे) रात्री सहलीवरून परतत असताना रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेत गाडीतील आठही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
निखिलने BE Chemical चे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील एका केमिकल कंपनीमध्ये नोकरी मिळवली होती. कष्टकरी शेतकरी कुटुंबातील निखिल हा घरचा आधार बनत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.
तर उत्कर्षने B.Com चे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. कोरोनाच्या काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर घराची जबाबदारी आई, आज्जी आणि मोठ्या भावावर आली होती. आई मजुरी करून संसार चालवत होती, तर मोठा भाऊ पिंपरी-चिंचवड येथील महिंद्रा कंपनीमध्ये काम करत होता. अशा कठीण परिस्थितीतही उत्कर्ष मोठी स्वप्ने पाहत होता.
निखिल आणि उत्कर्ष हे केवळ मित्र नव्हते, तर एकमेकांच्या सुख-दुःखात कायम साथ देणारे जिवलग होते. गावात दोघांची मैत्री आदर्श मानली जायची. पण नियतीने एका क्षणात दोघांनाही हिरावून नेले.
या हृदयद्रावक घटनेने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या युवकांपैकी आसगाव येथील महेश पवार या तरुणाचा कालच वाढदिवस होता. कालपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने वातावरण अधिकच भावूक झाले आहे.
हसत-खेळत सहलीला गेलेले हे तरुण आता कायमचे निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मर्ढे गावात सर्वत्र शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर एकच प्रश्न आहे असं कस घडलं?











