* पोपटवाडीतील पाण्याच्या टाकीच्या पुनर्बांधणीची मागणी; नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन*


निरांजना न्यूज-निलेश बाबर 

उडतरे गावातील पोपटवाडी परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीची पुनर्बांधणी करावी तसेच टाकीखाली असलेल्या ओढ्याच्या परिसराची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी पोपटवाडी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत उडतरेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पोपटवाडी येथील पाण्याची टाकी सुमारे ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. कालांतराने टाकीचे बांधकाम जीर्ण झाले असून काही ठिकाणी सळया बाहेर आल्याने टाकी धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. सध्या याच टाकीतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

परिसरातील लोकसंख्या वाढल्यामुळे विद्यमान टाकीची साठवण क्षमता अपुरी पडत असून अनेक नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या टाकीची पुनर्बांधणी करून वाढीव क्षमतेची नवीन टाकी उभारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याशिवाय टाकीजवळील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा व पावसामुळे वाहून आलेला गाळ साचल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे डास व इतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून ओढ्याची साफसफाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पोपटवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून ग्रामपंचायतीकडे ते सादर करण्यात आले आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!