* उडतरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; आणखी तीन युवकांची शहर पोलीस दलात निवड*


उडतरे ता. वाई येथील युवकांनी पुन्हा एकदा गावाचे नाव अभिमानाने उंचावले असून गावातील आणखी तीन युवकांची शहर पोलीस पदासाठी निवड झाली आहे. श्रवण सुनील डूबल, ओंकार भरत कुंभार आणि निशांत प्रसाद बाबर या तिन्ही युवकांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे उडतरे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

उडतरे गाव हे आधीपासूनच सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक युवक सैन्य दलात कार्यरत असून देशसेवेची परंपरा गावाने जपली आहे. आता त्याच परंपरेत पोलीस भरतीतही गावातील युवक मोठ्या संख्येने यश मिळवत असल्याने “सैनिक आणि पोलीस भरतीचे गाव” अशी नवीन ओळखही उडतरेला मिळू लागली आहे.

गावातील युवकांमध्ये लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि देशसेवेची भावना रुजलेली दिसून येते. पहाटेपासून मैदानावर धावणे, मैदानी सराव, शारीरिक चाचणीची तयारी, लेखी परीक्षेसाठी अभ्यास अशा विविध प्रकारचा सराव युवक सातत्याने करत असतात. अनेक युवक प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळते.

विशेष म्हणजे गावातील युवक एकमेकांना मार्गदर्शन करत सामूहिक सराव करतात. कोणाकडे साधनांची कमतरता असली तरी मित्रमंडळी एकत्र येत तयारी करतात. त्यामुळे गावात स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना अधिक दिसून येते. जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर उडतरे गावातील युवक सातत्याने विविध भरती प्रक्रियेत यश मिळवत आहेत.

श्रवण डूबल, ओंकार कुंभार आणि निशांत बाबर यांच्या यशामुळे गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळाली असून आगामी काळात आणखी युवक सैन्य व पोलीस दलात दाखल होतील, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!