* धोकादायक ‘विकास’! सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून पाईपलाईनचे काम सुरू*


निरंजना न्यूज नेटवर्क 

२४ तास पाणी योजनेसाठी रस्ते खोदले, पण सुरक्षेचे फलक गायब;

वाई दि. ०१ : वाई शहरात २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी ठिकठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही योजना शहराच्या विकासासाठी स्वागतार्ह असली तरी, ज्या पद्धतीने हे काम राबवले जात आहे, त्यातून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. रस्ते खोदल्यानंतर ना तिथे सावधानतेचा फलक आहे, ना रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर! प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता वाईकर विचारत आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असल्याने शहरात वाहनांची मोठी वर्दळ आहे. त्यातच पाईपलाईनसाठी रस्ता खोदल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहिली आहे. मुजवलेल्या खड्ड्यांवरही योग्य मातीकाम न केल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणताही धोका दर्शवणारा बोर्ड नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच वाई-धोम रस्त्यावरील मेणवली हद्दीत स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकींची भीषण धडक होऊन दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर झालेले अस्ताव्यस्त पार्किंग! मंगल कार्यालयात येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा घात झाला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे आज दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती आता वाई शहरात निर्माण झाली असून, खोदकामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर आता प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर समस्या असताना आणि लोकांचा जीव धोक्यात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र ‘मौन’ धारण केले आहे. प्रशासनावर वचक निर्माण करण्याऐवजी लोकप्रतिनिधी गप्प का? ठेकेदार आणि प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला कोणाचे पाठबळ आहे, याची चर्चा आता चौकाचौकात रंगत आहे.
पाणी योजना हवीच, पण ती लोकांचा जीव घेऊन कशाला? किमान सुरक्षेचे नियम पाळून काम करणे ही कंत्राटदार आणि पालिकेची जबाबदारी नाही का? रात्री एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!