*वाई तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीत व्यस्त* थंडी वाढल्याने पेरणीला वेग, पेरणीसाठी ट्रॅक्टर कडे शेतकऱ्यांचा वाढता कल.


निरंजना न्यूज- निलेश बाबर

दोन दिवसांपासून वाई तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागल्याने रब्बीच्या शेती कामांना वेग आला असून शेतकरी रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पिकांच्या पेरणीत व्यस्त असताना येत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीत पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. थंडीमुळे रब्बी पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले असून शेतकरी वर्ग रब्बी पेरणीसाठी सरसावले असताना दिसत आहेत. दरम्यान, रब्बी पेरणी करताना आर्थिक चणचण भासत असतानाही शेतकरी कर्ज काढून रब्बी पेरणीची तयारी करताना आढळत आहेत. यंदाच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीही शेतकरी झाले गेले विसरून रब्बी हंगामातील पिकां मधून भरपाई कशी काढता येईल याची तयारी करत आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खते, बि – बियाणे यांची खरेदी सुरू केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झाली आहे. रब्बी पिकांसाठी थंडी पोषक असल्याने रब्बीतील ज्वारी, हरभरा गहू या पिकांसाठी शेतकरी वर्ग पूर्व मशागत व पेरणीची कारणे जोमात करताना आढळून येत आहेत. यंदा मे महिन्यापासूनच ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत खरीप हंगामाची दुरावस्था झाली. शेतातील माती अक्षरशः खरडून वाहून गेली. शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. मात्र, पावसाने झालेले नुकसानीचे घाव विसरून कशीबशी पैशाची जुळवाजुळ करीत शेतकरी वर्ग रब्बी हंगामाच्या तयारीला लागला असून शेताची मशागत करणे, पेरणी योग्य जमीन तयार करण्याची लगबग सर्वत्र सुरू असून शेतकरी खरीप हंगाम तोट्यात गेलेले विसरून आता रब्बीच्या हंगामावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असो की आताच्या रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. यातच रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खतांची झालेली भरमसाठ वाढ हे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले असून हे संकट शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. तरीसुद्धा उसनवारी करून कर्ज काढून शेतकरी रब्बी पेरणी करताना दिसत आहेत.

ऊस लागवडीत वाढ*- यावर्षी अति पावसामुळे ओढे,नदी, बंधारे तलाव, धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाल्याने वाई तालुक्यात सर्रास ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असून सर्वत्रच ऊसाची लागवड सुरू असून यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.

बैलांची संख्या कमी झाल्याने पेरणीसाठी ट्रॅक्टर कडे शेतकऱ्यांचा वाढता कल* बैलांच्या संख्येत घट झाल्याने युवा शेतकरी छोटे ट्रॅक्टर खरेदी करताना दिसून येत आहेत. वाड्या वस्त्यावर ही यंत्रे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या ट्रॅक्टर द्वारे मशागत आणि पेरणी जलद गतीने होत असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी ट्रॅक्टर चालकांकडे मागणी वाढली आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!