उडतारे दि.०८
प्रतिनिधी – निलेश बाबर, उडतारे
मुंबईवरून बेंगलोरकडे माल भरून निघालेल्या ट्रकला आणेवाडी टोल नाक्याजवळ अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रकमध्ये असलेल्या मालाला अचानक आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण माल जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपरिषद अग्निशामक दल, वाई नगरपरिषद अग्निशामक दल तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली. सर्वांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तसेच एनएचआय हेल्पलाईनच्या पथकानेही घटनास्थळी तात्काळ मदतकार्य केले.
दरम्यान, या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.










