*नामदार नितीनजी गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवारी – प्रमोद शिंदे*


दि.१३/५/२०२६ – किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५” या वर्षी भारताचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नववहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना जाहीर करण्यात आलेला होता. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.९ मे रोजी होणार होते. काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि.१५ मे रोजी वाजता विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केली आहे.

माहितीपत्रकात पुढे म्हटले आहे की, शनिवार दि. ९ मे रोजी कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली होती. परंतु ढगाळ वातावरणामुळे केंद्रिय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे हेलिकॉप्टरचे उड्डान न करता आल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. त्यावेळी गडकरी साहेबांनी या कार्यक्रमाची तारीख लवकरच देणार असल्याची ग्वाही दिलेली होती. त्याप्रमाणे गडकरी साहेबांच्याकडुन हा पुरस्कार स्विकारण्यासाठी शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर येत असल्याचे कळविण्यात आले. नामदार नितीनजी गडकरी यांना हा पुरस्कार विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील आहेत. कार्यक्रमास राज्याचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शुक्रवारी १५ मे रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार वितरण समारंभास कारखाना कार्यक्षत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तोडणी वाहतुक मुकादम, वाहतुक कंत्राटदारांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!