उडतारे गावातील श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण व मूर्तीस्थापना सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विधीवत होम-हवन तसेच श्री हनुमान मूर्ती स्नानाने करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारात पार पडलेल्या या धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या धार्मिक सोहळ्यास माहेरवाशीण महिला, ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तीचा महासागर अनुभवला. मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
या सोहळ्यात वसई येथील बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर मठ यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीस्थापना व कलशारोहण विधी संपन्न झाला. धार्मिक विधी दरम्यान मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसर भारावून गेला होता.
त्यानंतर ह.भ.प. सुभाष जाधव तसेच उडतारे ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या भजन कार्यक्रमाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. पारंपरिक भजन आणि हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सोहळ्याची सांगता सद्गुरू बाळकृष्ण (दादा) वसंत गडकर यांच्या आध्यात्मिक कीर्तनाने झाली. आपल्या कीर्तनातून त्यांनी भक्ती, संस्कार आणि समाजएकतेचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी निरुपणाने उपस्थित भाविक भारावून गेले.
या भव्य धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व उडतारे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले.











