निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
लाखो रुपयांचा निधी धुळीस; प्रशासनाला अपघातात कोणाचा जीव गेल्यावरच जाग येणार का?*
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे (ता. वाई) येथील सेवा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी संबंधित यंत्रणा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) अजूनही जाग आलेली नाही. प्रशासनाच्या या अडेलतट्टू धोरणामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, “अपघातात कोणाचा नाहक बळी गेल्यावरच हे पथदिवे सुरू होणार का?” असा आक्रमक सवाल आता विचारला जात आहे.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल केला जातो. तसेच सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून हे पथदिवे उभारण्यात आले आहेत. मात्र, केवळ योग्य देखभालीअभावी हे दिवे धुळखात पडले आहेत. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी थेट पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सेवा रस्त्यावर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधारामुळे रस्त्यावरील दुभाजक (Divider), अचानक समोर येणारे खड्डे आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने चालकांना दिसत नाहीत. परिणामी, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.
त्याच बरोबर
अंधाराचा फायदा घेऊन या भागात अनुचित प्रकार घडण्याची किंवा चोरी-लुटमारीसारख्या गुन्हेगारी घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अत्यंत गंभीर बनला आहे.










