भुईंज पोलीस ठाण्याचा कायापालट; सातारा – पुणे महामार्गावरील अद्ययावत पोलीस ठाणे म्हणून नवी ओळख ;


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

प्रवेशद्वारावरील दत्त मंदिरामुळे आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती ; रमेश गर्जे यांचे योगदान; पृथ्वीराज ताटेंकडून उभारी;

सातारा-पुणे महामार्गावरील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या भुईंज पोलीस ठाण्याने आता सुसज्ज व अद्ययावत पोलीस स्टेशन म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पोलीस ठाण्यात आवश्यक त्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच, महिला कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, बिट अंमलदार विश्रांती कक्ष, यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेला ही सक्षम स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, गुन्ह्यांचा तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भुईंज पोलीस ठाण्याची कार्यक्षमता अधिक प्रभावी झाली आहे.
भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले दत्त मंदिर हे या पोलीस ठाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. कर्तव्यावर रुजू होताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रथम गुरुदत्ताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कर्तव्य भावनेसह सकारात्मक व आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येते.
भुईंज पोलीस ठाण्याला सुसज्ज करण्यासाठी बदली झालेले तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी विशेष प्रयत्न केले. पोलीस ठाण्यातील आवश्यक सुविधा, कार्यालयीन व्यवस्था तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामकाजासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याला अधिक शिस्तबद्ध व सुसज्ज स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना आपली तक्रार मांडताना अडचण येऊ नये, तसेच पोलिसांना तपास व प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे करता यावे, यासाठी उपलब्ध सुविधांचा चांगल्या पद्धतीने वापर केला जात आहे.
दरम्यान, भुईंज पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारलेले नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनीही पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी उभारी दिली आहे. महामार्गावरील वाहतूक, अपघात, गुन्हेगारी तसेच परिसरातील कायदा-सुव्यवस्था या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.
सातारा-पुणे महामार्गावरील भुईंज परिसर हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असल्याने या पोलीस ठाण्यावर मोठी जबाबदारी आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक, अपघातांची शक्यता, स्थानिक गुन्हेगारी तसेच विविध सामाजिक प्रश्नांचा सामना करताना आधुनिक सुविधा आणि सक्षम मनुष्यबळाचा मोठा फायदा होत आहे.
भुईंज पोलीस ठाण्यातील बदलामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामासाठी चांगले वातावरण मिळत असून, नागरिकांनाही पोलीस ठाण्यातील सुविधांचा लाभ मिळत आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेपासून कार्यालयीन व्यवस्थे पर्यंत झालेली सुधारणा आणि नवीन नेतृत्वामुळे भुईंज पोलीस ठाणे आता सातारा-पुणे महामार्गावरील अद्ययावत व सुसज्ज पोलीस स्टेशन म्हणून नावारूपाला येत आहे.
भुईंज पोलीस ठाण्याला सुसज्ज रूप देण्यासाठी योगदान देणारे तत्कालीन सपोनि रमेश गर्जे तसेच सध्याचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेणारे सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवून भुईंज पोलीस ठाण्याचा कारभार अधिक प्रभावीपणे सुरू राहण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

*कर्तव्याला सुरुवात करण्यापूर्वी दत्तगुरूंचा आशीर्वाद*– भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर असलेले दत्त मंदिर हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य ठरले आहे. दिवसभर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी धावपळ करणारे अधिकारी व कर्मचारी अनेकदा कर्तव्याच्या सुरुवातीला श्री दत्ताचे दर्शन घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात भक्ती आणि कर्तव्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
‘कर्तव्याला सुरुवात करण्यापूर्वी दत्तगुरुंचा आशीर्वाद’ अशी भावना अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आधार आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र ठरत आहे.

*सपोनी रमेश गर्जे व सपोनी पृथ्वीराज ताटे यांचे सर्व स्तरातून कौतुक* –– तत्कालीन सपोनि रमेश गर्जे यांनी केलेल्या पायाभूत सुधारणांमुळे भुईंज पोलीस ठाण्याला अद्ययावत व सुसज्ज स्वरूप मिळाले, तर सध्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी या व्यवस्थेला पुढे नेत कारभाराला नवी उभारी दिली आहे. त्यामुळे भुईंज पोलीस ठाणे आता केवळ एक नियमित पोलीस ठाणे न राहता सातारा-पुणे महामार्गावरील अद्ययावत, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख पोलीस स्टेशन म्हणून नावारूपाला येत असून नागरिकांकडून सपोनी रमेश गर्जे व सपोनी पृथ्वीराज ताटे यांचे कौतुक होत आहे.


115
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!