निरंजना न्यूज नेटवर्क
भुईंज प्रतिनिधि –
भुईंज, दि २९ प्रतिनिधी : भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री सुरू असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान सुरूर ता. वाई येथील ब्रिजखाली कमरेला देशी बनावटीचे पिस्टल लावून उभ्या असलेल्या संशयितास भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांच्यासह सरकारी वाहनातून भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
पेट्रोलिंग दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, सुरूर गावच्या हद्दीतील सुरूर ब्रिजखाली सदर इसम हा कमरेला पिस्टल लावून उभा आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पंचांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस पथक पंचांसह माहिती मिळालेल्या ठिकाणी दाखल झाले. तेथे बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले.
पोलिसांनी सदर पिस्टल जप्त करून संशयिता विरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीस वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्टलची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करीत आहेत.












