निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे : प्रतिनिधी – निलेश बाबर
उडतरे येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या या पथदिव्यांचा उपयोगच होत नसल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उडतरे परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर आणि सर्विसरोड वर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अवजड वाहने, चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची संख्या मोठी असते. महामार्गावरील काही ठिकाणी वळणे, दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला असलेली वाहतूक व्यवस्था लक्षात घेता पुरेशा प्रकाशाची आवश्यकता असते. मात्र, पथदिवे बंद असल्याने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते.
लाखो रुपये खर्च, तरीही पथदिवे बंद
महामार्गाचे सुशोभीकरण व सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पथदिव्यांवर मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र, दिवे नियमित सुरू राहत नसतील तर या सुविधेचा अपेक्षित फायदा वाहनचालकांना मिळणार कसा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पथदिव्यांची देखभाल, वीजपुरवठा आणि तांत्रिक बिघाड याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
पावसाळ्यात ढगाळ वातावरण, पावसाची सर आणि कमी दृश्यमानता यामुळे रात्री वाहन चालविताना आधीच अडचणी निर्माण होतात. त्यात महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रस्ता, दुभाजक आणि बाजूला उभी असलेली वाहने वेळेत दिसत नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. अचानक समोर येणारा अडथळा, रस्त्याच्या कडेला उभे असलेले वाहन किंवा दुभाजकाचा अंदाज न आल्यास अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उडतरे परिसरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने तपासून त्यातील तांत्रिक बिघाड दूर करावा, वीजपुरवठा सुरळीत आहे की नाही याची पाहणी करावी तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
महामार्गावरील पथदिवे केवळ शोभेसाठी न राहता रात्रीच्या वेळी प्रत्यक्षात सुरू राहणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच संबंधित विभागाने दखल घेऊन पथदिवे सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उडतरे येथील महामार्गावरील पथदिव्यांची तातडीने पाहणी करून बंद दिवे सुरू करण्याची कार्यवाही संबंधित विभाग करणार का, याकडे आता वाहनचालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.











