भुईंज परिसरात वीज प्रश्नाचा भडका; महावितरण विरोधात आंदोलनाचे रणशिंग!


निरंजना न्युज नेटवर्क – निलेश बाबर

डॉ. सुरभी भोसले यांचा आक्रमक पवित्रा; वाई कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात तक्रारींचा पाऊस

वाई दि. १८ : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वाई तालुक्यातील भुईंज आणि परिसरातील गावांमधील शेतकरी महावितरणच्या गलथान कारभारामुळे होरपळून निघत आहेत. तालुक्यात इतर ठिकाणी दिवसा वीज मिळत असताना, केवळ भुईंज परिसरावरच हा अन्याय का? असा सवाल उपस्थित करत, येथील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. या प्रश्नी तोडगा न निघाल्यास पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्या डॉ. सुरभी मदन भोसले यांनी दिला आहे.
वाई तालुक्यातील अनेक गावांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा केला जातो. मात्र, भुईंज परिसरातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक रात्रीच्या वेळी किंवा अत्यंत गैरसोयीच्या वेळेत वीज दिली जात असल्याचा आरोप होत आहे. वाढत्या उन्हामुळे पिके करपू लागली असून, रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण शारीरिक आणि मानसिक त्रासही वाढला आहे.
भुईंज येथील शाखा अभियंत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि महावितरणच्या दुजाभावामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “इतर गावांना एक न्याय आणि भुईंजला दुसरा का?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार राजकीय दबावापोटी केला जात आहे की काय, अशी शंकाही आता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून डॉ. सुरभी भोसले यांनी थेट वाईचे कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. तेथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता केरनाथ साळी यांची भेट घेऊन त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला आणि शेकडो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले.
“महावितरण जाणीवपूर्वक भुईंजच्या शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. जर तातडीने दिवसा वीज पुरवठा सुरू झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
शेतीपंपासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळावा, विस्कळीत वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी भुईंज शाखा अभियंत्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी भुईंजचे सरपंच विजय वेळे, चेअरमन मदन शिंदे, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आता महावितरण यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!