निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे (प्रतिनिधी):दि-१८
तालुक्यातील उडतरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा विद्यार्थी स्पंदन विजय जाधव याने शैक्षणिक क्षेत्रात आपली चमक दाखवत दुहेरी यश संपादन केले आहे. स्पंदनने सैनिक स्कूल आणि केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय या दोन्ही प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये स्पंदनने ३०० पैकी २६४ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. त्याचबरोबर, केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही त्याने ९७.५०% गुण प्राप्त करून आपला प्रवेश निश्चित केला आहे.
स्पंदन हा उत्तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक श्री. सर्जेराव जाधव यांचा नातू असून, वाई तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. विजय जाधव व प्राथमिक शिक्षिका सौ. अश्विनी जाधव यांचा मुलगा आहे. त्याला लाभलेल्या या शैक्षणिक वारशाचे आणि त्याने केलेल्या कष्टाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पंदनच्या या यशाबद्दल उडतरे केंद्राचे गटशिक्षणाधिकारी श्री. हर्षवर्धन मोरे साहेब यांनी स्पंदन आणि त्याचे मार्गदर्शक वर्गशिक्षक श्री. रमेश गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. या यशाबद्दल उडतरे येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि हितचिंतकांनी स्पंदनवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.











