निरंजना न्यूज नेटवर्क
जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या “वसुंधरेसाठी वृक्षारोपण” उपक्रमात प्रथम–द्वितीय क्रमांकाचा मान
आनेवाडी दि-२७
पर्यावरण संवर्धनासाठी शासनासह विविध सामाजिक संस्थांकडून अनेक उपक्रम राबवले जात असताना रायगाव (ता. जावळी) येथील सेंद्रिय शेतकरी जितेंद्र मारुती कदम आणि त्यांच्या पत्नी सौ. आशा कदम यांनी आपल्या शेतात तब्बल १,२२५ वृक्षांची लागवड करून प्रेरणादायी उदाहरण घडवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “एक पेड़ माँ के नाम” या संदेशाला अनुसरून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणीजधाम यांच्या जन्मोत्सवानिमित्त “वसुंधरेसाठी वृक्षारोपण” ही भव्य मोहीम राबवण्यात आली. देश-विदेशातील भारतीयांच्या सहभागातून या अभियानात तब्बल १,११,४२४ वृक्षांची लागवड करण्यात आली.
या मोहिमेत रायगावचे सुपुत्र जितेंद्र कदम आणि त्यांच्या पत्नी आशा कदम यांनी १,२२५ झाडे लावून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या कार्याचा गौरव नाशिक येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात जगतगुरू नरेंद्राचार्यजी, महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सेंद्रिय शेती क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या कदम दांपत्याने यावेळी फळझाडे, औषधी वनस्पती व इतर उपयुक्त जातींची लागवड केली. या उपक्रमात त्यांचे पुत्र अजिंक्य आणि अभिनय, तसेच भाऊ राजेंद्र कदम यांचाही महत्त्वाचा सहभाग राहिला.
सातारा जिल्ह्यातील ही आगळीवेगळी वृक्षलागवड पाहण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी रायगावला भेट देत असून कदम दांपत्याचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सातारा जिल्ह्यातील वृक्षप्रेमींकडून मोठे कौतुक होत आहे.











