शंभूराजांच्या बलिदानाने वाई हेलावली; हजारो धारकऱ्यांची मूक पदयात्रा!


निरंजना न्यूज नेटवर्क- निलेश बाबर

बलिदान मासाची सांगता: वाईच्या रस्त्यांवर शिवशौर्याचा जागर, जनसागर लोटला!

वाई दि. १९ : “देह अर्पिला पण स्वाभिमान नाही,” या तेजस्वी विचाराने औरंगजेबाच्या अमानवीय छळाला सामोरे जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सांगता वाई शहरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. ब्राह्मणशाही चौक, वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हजारो धारकऱ्यांनी सहभाग नोंदवून शिवपुत्राला अभिवादन केले.
‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’ निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाई तालुक्याच्या वतीने बुधवारी वाई शहरात अभूतपूर्व मूक पदयात्रा काढण्यात आली. “जळतील आमची ही शरीरे, पण स्वधर्म आणि स्वराज्य कधीही सोडणार नाही,” असा बाणा जपणाऱ्या शंभूराजांना अभिवादन करण्यासाठी हजारो धारकरी आणि शिवभक्त वाईच्या रस्त्यांवर उतरले होते.
बुधवारी सकाळी ७:०० वाजल्यापासून ब्राह्मणशाही चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. वाई शहर व परिसरातील नागरिकांनी यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी ७ वा. प्रेरणा मंत्राने पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची शांतता आणि शिस्त. पदयात्रेच्या अग्रभागी भगवा ध्वज आणि वढू बुद्रुक येथे असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ येथून आणलेली ‘दिव्य ज्योत’ डौलाने तळपत होती. त्यामागे युवती धारकरी, त्यानंतर युवक धारकऱ्यांची मोठी फळी आणि सर्वात शेवटी फुलांनी सजवलेल्या रथामध्ये धर्मवीर शंभूराजांची मूर्ती विराजमान होती. रथात विराजमान असलेली संभाजी महाराजांची मूर्ती पाहून वाईकरांचे डोळे पाणावले. इतिहासाची साक्ष देत ‘दिव्य ज्योत’ संपूर्ण मार्गावर तेवत होती.
पदयात्रा ब्राह्मणशाही चौक – किसनवीर चौक – सोनगीरवाडी – एस. टी. स्टँड – सिद्धनाथवाडी – गणपती मंदिर – शाहीर चौक – नावेची वाडी – गंगापुरी – भगवा कट्टा – नगरपरिषद – दातार हॉस्पिटल – चावडी चौक – रविवार पेठ मार्गे पुन्हा ब्राह्मणशाही चौकात आली.
या पदयात्रेत वाई तालुक्यातील धारकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. विशेषतः युवतींचा सहभाग लक्षणीय होता. अत्यंत शांततेत निघालेल्या या यात्रेने संपूर्ण वाई शहराचे वातावरण भारावून टाकले होते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाई पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
पदयात्रेच्या शेवटी ज्येष्ठ धारकरी सुनील बापू लाड यांचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान’ या विषयावर मार्गदर्शन झाले. १ फेब्रुवारी १६८९ रोजी झालेली फितुरी आणि ११ मार्च १६८९ फाल्गुन अमावस्या रोजी झालेली महाराजांची हत्या, या दरम्यानच्या ४० दिवसांतील शौर्याचा इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. यावेळी सुनील बापू लाड म्हणाले की, “महाराजांनी ४० दिवस सोसलेल्या मरणयातना हा केवळ इतिहास नसून, तो प्रत्येक हिंदूच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. वढू बुद्रुक येथे शिवले घराणे आणि गोविंद गोपाळ महार यांनी दाखवलेले धाडस आजही आपल्याला प्रेरणा देते.”
४० दिवस अमानवीय छळ सोसूनही धर्मासाठी बलिदान देणाऱ्या राजांचा इतिहास ऐकताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
शेवटी ध्येय मंत्राने या बलिदान मासाची सांगता करण्यात आली.


72
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!