निरंजना न्यूज नेटवर्क
दि. 23/06/2026 रोजी बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील ड्रग्स गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा कार क्रमांक KL09AG0334 मधून सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जात आहे. प्राप्त माहितीच्या आधारे भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी व वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून सदर वाहन थांबविले.
वाहनातील इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शंमूगम श्रीनिवास, रा. गणपती नगर, चेन्नई, तमिळनाडू असे सांगितले. पडताळणीअंती सदर इसम हा जी-1 विपेरी पोलीस ठाणे, चेन्नई येथील गुन्हा रजि. क्र. 182/2026, NDPS Act कलम 8(c), 22(b), 22(c), 25, 29(1) मधील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आरोपीस पुढील तपास व कारवाईकरिता जी-1 विपेरी पोलीस ठाणे, चेन्नई येथील पोलीस निरीक्षक श्री. रविचंद्रन एम. व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत सपोनि श्री. पृथ्वीराज ताटे, पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ,अजित पवार,रोहन चव्हाण यांनी सहभाग घेतला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.











