कवठे-केंजळची तहान भागली! उपसा सिंचन योजनेचे पाणी पहिल्यांदाच तलावात; बळीराजा सुखावला


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

वाई दि. ०१ : वाई तालुक्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कवठे-केंजळ उपसा सिंचन योजनेने अखेर ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या योजनेचे पाणी पहिल्यांदाच कवठे तलावात खळाळत पोहोचले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे भरते आले असून, कृषी विकासाला आता नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे कवठे, केंजळ आणि परिसरातील गावांमधील शेतजमिनीचा पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. तलावात पाणी दाखल होताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी जल्लोष केला. अनेक वर्षांपासून पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या या भागाला आता शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे.
या यशाबद्दल माहिती देताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले की, “ही योजना केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून या भागातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचे द्वार आहे. नियमित पाणीपुरवठ्यामुळे पिकांची उत्पादकता वाढेल आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.”
ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे मंत्र्यांनी विशेष कौतुक केले. स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि प्रशासनाचा समन्वय यामुळेच हा कठीण टप्पा पार करता आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उर्वरित सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!