यवतेश्वरसह कोटेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त सातारा शहराजवळील यवतेश्वर मंदिरासह गोवे-लिंब येथील प्रसिद्ध श्री कोटेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच दोन्ही ठिकाणी भाविकांची वर्दळ वाढली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
सातारा शहरापासून जवळ असलेल्या यवतेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी सातारा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेक भाविकांनी अभिषेक, जलाभिषेक व पूजा-अर्चा केली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याने मंदिर परिसरात दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. दुचाकी, चारचाकी तसेच खासगी वाहनांमधून भाविक आल्याने यवतेश्वर परिसरातील रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, गोवे-लिंब (ता. सातारा) येथील श्री कोटेश्वर मंदिरातही पहाटेपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कोटेश्वर देवस्थानाला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगास कृष्णा नदीतील पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पहाटेपासून दिवसभर दर्शन व जलाभिषेकासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गोवे-लिंब येथील श्री कोटेश्वर मंदिर परिसरात सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गर्दी व वाहतुकीचे नियोजन केले.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी यवतेश्वर तसेच कोटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने आगामी सोमवारीही भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!