निरंजना न्यूज नेटवर्क- निलेश बाबर
देशभरातील घोडेप्रेमींची पसंती; लाखोंच्या किमतीत घोड्यांची खरेदी-विक्री; पाचवड बाजाराला मोठ्या विस्ताराची संधी; कोट्यावधींची उलाढाल
पाचवड (ता. वाई) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेला घोडे बाजार सध्या घोडेप्रेमी आणि घोडे व्यावसायिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेषतः राजेशाही डौल, मजबूत बांधा, चपळता आणि वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीमुळे ‘मारवाड’ जातीच्या घोड्यांना बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. देशभरातून खरेदीदार या बाजारात दाखल होत असून, लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
पाचवडच्या बाजारात सध्या जवळपास ५० च्या आसपास घोड्यांची दावण सजली असून, त्यांची किंमत साधारणपणे ३ लाखांपासून तब्बल २० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. घोड्याची जात, बांधा, उंची, रंग, चाल, धावण्याची क्षमता, प्रशिक्षण आणि वंशावळ यानुसार त्याची किंमत ठरते. त्यामुळे पाचवडचा घोडे बाजार दिवसेंदिवस विस्तारत असून, भविष्यात या बाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाचवडच्या घोडे बाजाराचे आकर्षण आता महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकासह विविध राज्यांतील घोडेप्रेमी व व्यावसायिक येथे घोडे खरेदीसाठी येत आहेत. बाजारात दाखल होणाऱ्या घोड्यांची संख्या आणि खरेदीदारांचा वाढता प्रतिसाद पाहता बाजार समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने या बाजाराचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहे.
पाचवडच्या बाजारातील घोड्यांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. अनेक घोडेप्रेमी मोबाईलमध्ये घोड्यांचे फोटो आणि व्हिडिओ टिपताना दिसतात. घोड्यांची जात, प्रशिक्षण, चाल आणि वैशिष्ट्यांबाबत व्यावसायिकांकडून माहिती घेतली जात आहे.
मंगळवारी बाजारात आलेल्या नागरिकांकडून घोड्यांची चौकशी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. विविध कार्यक्रमांसाठी घोड्यांना मोठी मागणी असते. तसेच दसरा, दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर घोड्यांची खरेदी-विक्री वाढण्याची शक्यता आहे.
— *लग्न समारंभासाठी घोड्यांना पसंती*–
लग्नसमारंभ, मिरवणुका आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांसाठी घोड्यांचा वापर केला जात असल्याने चांगल्या जातीच्या घोड्यांना विशेष मागणी आहे. ग्राहकांकडून घोड्याच्या किमती बरोबरच त्याची चाल, धावण्याची क्षमता, प्रशिक्षण आणि देखभाल याबाबतही बारकाईने माहिती घेतली जात आहे.
*पाचवड बाजाराच्या विस्ताराला मोठी संधी*–
पाचवडचा घोडे बाजार सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकातील घोडे व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहे. बाजारात वाढत असलेली उलाढाल, बाहेरील राज्यांतून येणारे खरेदीदार आणि मारवाड जातीच्या घोड्यांची वाढती मागणी पाहता पाचवडच्या घोडे बाजाराला भविष्यात राज्यातील प्रमुख घोडे बाजार म्हणून नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.











