उत्तरा जेष्ठ नागरिक संघाचे पर्यावरणपूरक पाऊल; अंत्यविधीसाठी गोवऱ्यांची सुविधा सुरू


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे (प्रतिनिधी) : उडतरे येथील उत्तरा जेष्ठ नागरिक संघ सामाजिक बांधिलकी जपत आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी पर्यावरणपूरक गोवऱ्यांचा वापर करण्याची सुविधा संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून पंचक्रोशीतील गावांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ ऑक्टोबर २०१५ रोजी स्थापन झालेल्या या संघाने गेल्या दहा वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमारे ३६५ जेष्ठ नागरिकांना एकत्र आणत संघटन मजबूत केले आहे. सभासदांच्या सोयीसाठी लोकवर्गणीतून १५० खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

२०१७ पासून संघाच्या माध्यमातून वैकुंठरथाची सेवा सुरू असून आजपर्यंत ५५० हून अधिक अंत्यविधीसाठी उडतरेसह २५ ते ३० गावांमध्ये या रथाचा वापर करण्यात आला आहे. वैकुंठरथासाठी भव्य शेड उभारण्यात आले असून २०२६ मध्ये रथाचे नूतनीकरण करून त्यात फुलांच्या माळा, रामनाम जपासाठी स्पीकर तसेच रात्रीसाठी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता पर्यावरणाचा विचार करून जंगलतोड रोखण्याच्या उद्देशाने महिलांनी तयार केलेल्या गोवऱ्या अंत्यविधीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावा, असे आवाहन संस्थापक प्रवीणअण्णा बाबर यांनी केले आहे.

उत्तरा जेष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम सामाजिक तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत असून परिसरातून त्याचे स्वागत होत आहे.


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!