सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत
निलेश बाबर
निरंजना न्यूज मिडिया उडतरे
दि-११-११-२०२५
पाचगणी मार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शनिवार रविवार या दिवशी पर्यटकांची वाहतूक या सेवारस्त्याने मोठ्या प्रमाणात होत असतानाही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
या मार्गावरील अतिक्रमण ,खोदलेले रस्ते,फुटलेले गटारांवरील चेंबर ,आणि अपुऱ्या रस्त्यामुळे वाहनांची गर्दी होण्याच्या आणि वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना वाढल्या असून, दोन चाकी वाहने एकमेकांना घासून अपघात होण्याचा धोका सातत्याने निर्माण होत आहे. विशेषतः शेतीच्या कामासाठी जाणारी तसेच वैद्यकीय वाहने,शाळेच्या बस ,आणि रोजच्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच आता अनेक कारखाने चालू झाले असल्यामुळे ऊसाची वाहतूक करणारी वाहने ही या रस्त्याने जात असतात त्याची वाहतूक वाढली तर खूप मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. परंतु अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गटारांवरील दुरुस्ती आणि अतिक्रमणे यांवरील उपाययोजना लवकरात लवकर न झाल्यास पुढील काळात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्याचा दर्जा सुधारण्याची आणि फुटलेले गटारावरील चेम्बर दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. स्थानिक ग्रामस्थांची परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











