पाचगणीत ५ लाखांचे कोकेन जप्त; ४२.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.. स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलिसांची संयुक्त कारवाई; १० आरोपी अटकेत


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

पाचगणी : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाचगणी येथे ५ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेटसह एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली असून या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचगणी येथील घाटजाई मंदिर परिसरात काही इसम कोकेन विक्रीसाठी आले आहेत.

या माहितीच्या आधारे पाचगणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विस्टा ग्रँड सोसायटीतील इस्टेला ‘ए’ बंगल्यासमोरील पार्किंगमध्ये छापा टाकला. तेथे स्कोडा रॅपीड (MH-02-DN-0259) व एम.जी. हेक्टर (MH-01-DK-8802) या वाहनांमध्ये संशयित आढळून आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ५ लाख रुपये किमतीचे कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत सदर अंमली पदार्थ पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३०५/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा) करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे (वाई विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.

अटक आरोपी :
मुंबई येथील रहिवासी असलेले महंमद नावेद सलिम परमार, सोहेल हशद खान, महंमद ओएस रिजवान अन्सारी, वासिल हमीद खान, महंमद साहिल अन्सारी, जिशान इरफान शेख, सैफ अली कुरेशी, महंमद उबेद सिध्दीकी, अली अजगर सादिक राजकोटवाला व राहिद मुख्तार शेख (सर्व वय २७ ते ३५ दरम्यान).


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!