भुईज प्रतिनिधी– सचिन इथापे.
शेतामध्ये सातत्याने होणाऱ्या रासायनिक खतांचा अतिवापर तसेच पिकांवर रोग, कीड पडू नये यासाठी अनेक शेतकरी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना दिसतात. मात्र यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत चालली असून मागील काही कालावधीपासून खते, कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीच्या संरक्षणासाठी पर्यावरण संतुलनासाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. पीक लवकर आणि जास्त प्रमाणात उत्पादन मिळावे यासाठी गेल्या काही वर्षात रासायनिक खत कीटकनाशकांचा शेतकऱ्यांनी भडीमार केला. मात्र रासायनिक खतांच्या अति वापरातील अन्नधान्य भाजीपाला शरीराला ही हानिकारक ठरू लागल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा पारंपारिक शेतीकडे कल वाढला आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून सध्या जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने कामाला गती आलेली आहे. असे असले तरी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सद्यस्थितीत शेतात तन वाढले असल्याने शेतकरी तणनाशक औषधे खरेदी करून फवारणी करीत असल्याचे दिसत आहेत. मागील काही हंगामा पासून या तन नाशक तसेच कीटकनाशक औषधांच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली असल्याने अनेक शेतकरी पुन्हा पारंपरिक सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. याच अनुषंगाने काही शेतकरी तण काढण्यासाठी तसेच इतर कीटकांचा नाश करण्यासाठी पारंपारिक औषधांचा वापर करताना दिसून येत आहेत. अनेक शेतकरी निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची सुद्धा फवारणी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतूनही भरघोस उत्पन्न घेतले असल्याने इतर शेतकऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे. सेंद्रिय शेतीतील होत असलेल्या भाजीपाला अन्नधान्य लाकडी घाण्या वरील खाद्यतेल याच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या विषमुक्त अन्नधान्य उत्पादनाची बाजारपेठेत मोठी मागणी होत असल्याने शेतकरी ही आता रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त अन्नपदार्थ निर्मितीकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे.
(चौकट)- शेतकरी या नैसर्गिक घटकांचा वापर करून कीड नियंत्रण करीत आहेत. यात सर्व प्रकारच्या आळ्या आणि रस, शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निंबोळी अर्क अत्यंत प्रभावी ठरते कडुलिंब, एरंड, करंज, पळस इत्यादी वनस्पतींच्या पानांपासून बनवले जाणारे दशपर्णी अर्क हे शक्तिशाली सेंद्रिय कीटकनाशक आहे. आले, लसून, मिरची मिश्रण असलेली औषधे फवारणी केल्यास बुरशीजन्य रोग आणि लहान किडींना पळवून लावण्यासाठी ती उपयुक्त ठरते. ट्रायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे. जे मुळाच्या आणि जमिनीतील रोगांचा नायनाट करते.











