उडतरे | प्रतिनिधी – निलेश बाबर
वाई तालुक्यातील उडतरे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जावळी तालुक्यातील महू धरणाच्या ही पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कुडाळी नदीच्या पाणीपात्रातील प्रवाहही मोठ्या प्रमाणात वाढला. या वाढलेल्या प्रवाहामुळे उडतरे येथील नदीवरील बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंत नसल्याचा फटका बसला आणि पाण्याने शेतीकडे मार्ग काढत मोठ्या प्रमाणावर रस्ता आणि शेतीचा बांध वाहून नेला .
या पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्यालगतचा शेतीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणावर माती व दगड वाहून गेल्याचे चित्र आहे. परिणामी सुमारे ४० ते ५० एकर शेतीचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू झाली असून शेतकरी मशागतीची तयारी करत आहेत. मात्र रस्ता वाहून गेल्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, औत तसेच इतर शेतीची अवजारे शेतापर्यंत नेणे अत्यंत कठीण झाले आहे. याशिवाय खत, बियाणे, औषधे तसेच ऊस व इतर पिकांच्या देखभालीसाठीही शेतकऱ्यांना मोठा फेरा मारावा लागणार असल्याने आर्थिक व वेळेचे नुकसान होणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना पुरेशा उंचीची संरक्षण भिंत किंवा कठडे नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात पुराचे पाणी शेतीकडे घुसते आणि माती वाहून जाते .यंदा मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने आणि संरक्षक भिंत अपुरी असल्यामुळे रस्ताच वाहून गेला. भविष्यात अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे, वाहून गेलेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षण भिंत व सुरक्षितता कठडे उभारावेत, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट न पाहता तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. अन्यथा खरीप हंगामातील शेतीची कामे विस्कळीत होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उडतरे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
यावेळी उडतरे गावचे उपसरपंच प्रकाश पवार,माजी ग्रामसेवक सुरेश बाबर,संतोष पवार ,रमेश पवार,हिंदुराव पवार,रमेश पवार,गिरीश पवार ,प्रशांत पवार ,विलास बाबर हे उपस्थित होते .











