निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
वाई तालुक्यातील उडतरे येथील कुडाळी नदीवरील बंधाऱ्यालगत पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या परिसराची जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक,सरपंच तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळी नदीला आलेल्या पुरामुळे बंधाऱ्यालगतचा शेतीकडे जाणारा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे सुमारे ४० ते ५० एकर शेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून कामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पाहणीदरम्यान बंधाऱ्यामध्ये पुराच्या पाण्याबरोबर आलेली लाकडे, झाडांच्या फांद्या व इतर साचलेला कचरा हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा आणि भविष्यात अशा समस्या कमी व्हाव्यात यासाठी नियमित स्वच्छता करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय संरक्षण भिंतीलगत आवश्यक त्या ठिकाणी भराव टाकून वाहून गेलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांची गैरसोय कमी व्हावी आणि शेतीच्या कामांना अडथळा येऊ नये, यासाठी कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनीही बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षणात्मक उपाययोजना अधिक भक्कम करण्याची मागणी केली. भविष्यात पूरस्थितीत रस्त्याचे नुकसान होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन केले.











