*विहिरीवरील मोटार चोरी प्रकरणी दोन चोरटे अटक*


निरंजना न्यूज नेटवर्क

भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने भुईंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक संतोष मोरे (वय २६) व रुपेश संतोष मोरे (वय २०, दोघे रा. कळंबे, ता. वाई) यांना अटक करण्यात आली आहे.

उडतारे, ता. वाई येथील खडकी रोड परिसरात चोरट्यांनी पाण्याच्या मोटारी चोरल्याची घटना घडली होती. याबाबत विशाल वसंत जगताप यांनी फिर्याद दिली होती. या परिसरात विहिरी व नदीकाठावरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने गस्त वाढवली होती. दरम्यान जांब गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी गस्तीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी उडतारे व खडकी परिसरातून पाण्याच्या मोटारी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सहा इलेक्ट्रिक मोटारी तसेच तांब्याच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोटार उघडण्याची साधने असा एकूण सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, हवालदार चंद्रकांत भोसले, नितीन जाधव, अमोल सपकाळ, अरूण दगडे, योगेश जमदाडे, सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, अभिजीत वाघमळे यांनी ही कारवाई केली.

भुईंज पोलिस स्टेशन मार्फत ग्राम सुरक्षा दलाची निर्मिती करण्यात आली असून ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. रात्रीची गस्त, पोलिसांच्या पेट्रोलिंगला मदत, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच चोरी-दरोडे रोखण्यासाठी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे अशी महत्त्वाची कामे ग्रामसुरक्षा दल करणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या काळात ग्रामस्थांना मदत करून पोलिसांना सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे गावांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
-पृथ्वीराज ताटे. प्रभारी अधिकारी भुईंज


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!