निरंजना न्युज नेटवर्क – निलेश बाबर
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेले खडकी हे निसर्गसंपन्न व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव सध्या मराठी चित्रपटसृष्टीचे नवे आकर्षण ठरत आहे. हिरवीगार झाडे , शांत ग्रामीण वातावरण, पारंपरिक घरे, मंदिर परिसर आणि स्वच्छ मोकळी जागा यामुळे चित्रपट व वेबमालिकांच्या चित्रीकरणासाठी खडकी गावाला पसंती दिली जात आहे.या गावातील लोकांचे अशा शूट साठी सहकार्य मिळत आहे त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि शेतकरी वर्ग असलेल्या या गावातील लोकांची ,तरुणांची आणि लहान मुलांची शूटिंग बघण्यासाठी आतुरता लागलेली दिसून येत आहे.
अलीकडच्या काळात काही मराठी चित्रपट, लघुपट तसेच जाहिरात चित्रीकरणासाठी खडकी गावाची निवड करण्यात आली असून, यामुळे गावाची ओळख सर्वत्र पोहोचू लागली आहे. शहरातील कृत्रिम सेटपेक्षा नैसर्गिक पार्श्वभूमी मिळत असल्याने दिग्दर्शक व निर्माते खडकी गावाकडे वळताना दिसत आहेत.
– प्रतिक्रिया-
चित्रीकरणामुळे गावातील युवकांना रोजंदारी, वाहन व्यवस्था, जेवण व इतर सेवा पुरवण्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
-प्रशांत भिकू शिंगटे,ग्रामस्थ खडकी
गावातील संस्कृती, परंपरा व निसर्गसौंदर्य मोठ्या पडद्यावर झळकू लागल्याने ग्रामस्थांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची वाढती पावले खडकी गावाकडे वळत असल्याने भविष्यात हे गाव ‘नवे शूटिंग हब’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.











