निरंजना न्यूज़ नेटवर्क- निलेश बाबर
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उडतारे गावचे माजी सरपंच स्वप्नील निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. कारखान्याची बिकट अवस्था असताना ज्यांनी कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला, त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
“किसनवीर कारखाना आर्थिक अडचणीत असताना कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. त्या काळात ना. मकरंद पाटील यांनी पुढाकार घेत कारखान्याला उभारी देण्याचे काम केले. कारखान्यावरील तब्बल १००० कोटी रुपयांचे कर्ज नील करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यानंतर सभासदांनीही ३४ कोटी रुपयांचे शेअर्सच्या माध्यमातून योगदान देऊन कारखान्याला आधार दिला. हा विश्वास कोणावर होता, तर तो ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावर होता,” असे निंबाळकर म्हणाले.
आज कारखाना पुन्हा उभा राहिला असून शेतकऱ्यांची देणी वेळेत दिली जात आहेत. मात्र, काही लोक केवळ राजकीय हेतूने आणि वैयक्तिक स्वार्थासाठी कारखान्याच्या नावाचा वापर करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सोशल मीडियावर बसून आरोप करणे, पोस्ट टाकणे आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेणे याने काही साध्य होणार नाही. जर एवढाच कारखान्याबद्दल कळवळा असेल तर प्रत्यक्ष समोर या, सभासदांसमोर बोला, आकडेवारी घेऊन चर्चा करा,” असे खुले आव्हान स्वप्नील निंबाळकर यांनी दिले.
प्रवीण बाबर यांच्या भूमिकेवर टीका करताना निंबाळकर म्हणाले, “स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेणाऱ्यांनी आधी कारखान्यासाठी केलेले योगदान सांगावे. २०२१ पासून ज्यांचा स्वतःचा ऊस नाही, ज्यांनी आजपर्यंत कारखान्याला ऊस मिळावा म्हणून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, त्यांनी अचानक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला सुरुवात केली आहे. हा दुटप्पीपणा सभासदांच्या लक्षात येत आहे.”
“ज्यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात साथ दिली नाही, ते आज कारखान्याच्या नावावर राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा घणाघातही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “प्रवीण बाबर यांच्या मागे ना कारखान्याचे कामगार उभे आहेत, ना मोठ्या प्रमाणात सभासद किंवा ग्रामस्थ आहेत. मग एवढा आटापिटा नेमका कशासाठी? कारखान्याच्या हितासाठी की वैयक्तिक स्वार्थासाठी, हे त्यांनी स्पष्ट करावे.”
किसनवीर कारखाना हा हजारो सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून कारखान्याची बदनामी करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही स्वप्नील निंबाळकर यांनी दिला.
“कारखान्याच्या प्रगतीत अडथळे आणण्यापेक्षा शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी एकत्र काम करा. केवळ आरोप करून नेतृत्व सिद्ध होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते,” असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.










