खरीप पेरणीला वेग; बियाणे व खतांच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

उडतरे दि-६-७-२०२६
वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतीकामात व्यस्त आहेत. यंदा भात, सोयाबीन, मका, बाजरी, तूर आणि भुईमूग या पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले जात आहे.
कृषी विभागाकडून विविध पिकांच्या सुधारित वाणांच्या बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच खासगी विक्रेत्यांकडेही बियाण्यांसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
उशिरा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या नांगरणी, कुळवणी आणि मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.कृषी तज्ज्ञांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन संतुलित खतांचा वापर करण्याचे तसेच प्रमाणित बियाण्यांचीच निवड करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत काही भागांत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः डीएपी व युरिया खतांसाठी वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा नियमित ठेवण्याची मागणी होत आहे. कृषी विभागाने मात्र आवश्यक त्या प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठिबक सिंचन, मृदापरीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर आणि यांत्रिकीकरणामुळे शेती अधिक फायदेशीर करण्याकडे कल वाढताना दिसत आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक नियोजन करण्याचा सल्ला दिला असून, कीड व रोग व्यवस्थापनासाठी नियमित पाहणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असल्याने यंदाचा पाऊस आणि पेरणीची सुरुवात समाधानकारक ठरल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदाचा खरीप हंगाम पावसामुळे उशिरा सुरू झाला असला तरी बचत गट, कृषि सेवा केंद्रे येथे तसेच शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे उपलब्ध असल्याने वाई तालुक्यात तरी बियाण्याची टंचाई भासणार नाही.याबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा
*श्री हरिश्चंद्र धुमाळ तालुका कृषि अधिकारी वाई*


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!