निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर,उडतरे
पाचवड (ता. वाई) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी विरोधकांवर टीका करत, “ ज्यांना जनतेने अनेक निवडणुकांमध्ये पराभूत करीत घरी बसवले आहे,ज्यांची कर्तबगारी आजिबात नाही त्यांना घाबरण्याचं कारण नाही” असे ठाम मत व्यक्त केले.
वाई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोणतीही कसूर केली नसल्याचे सांगताना पाटील म्हणाले की, वाई नगरपालिकेला आलेल्या अपयशामुळे आपण खचणारे नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी आपली लढाई सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
प्रचाराच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, उद्याची निवडणूक ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर लढवावी त्याचबरोबर प्रचार करताना शक्ती प्रदर्शन न करता मुद्द्यांच्या आधारे जनतेपर्यंत पोहोचावे.
जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, “तुम्ही सांगाल तो उमेदवार देण्याची आमची तयारी आहे”, असे सांगत आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या मताला महत्त्व दिले जाईल, हे स्पष्ट केले.
या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रमोद शिंदे,म्हणाले की जननायक,महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.पुढील होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन आबांनी केलेली आपली भूमिका पटउन देणे आवश्यक आहे.आबांनी केलेली विकासकामे सर्वसामान्य जनतेला सांगणे आवश्यक आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस प्रतापराव पवार म्हणाले की मकरंद आबा सारखे नेते आपल्याला भेटले आहेत हे आपलं नशीब आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तारणहार ठरलेल्या आबांनी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत केलेली आहे.
याप्रसंगी पाचवड गावाचे सरपंच बंडा नाना गायकवाड, सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष कांतीलाल पवार ,उद्योजक अनिल पवार,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न आणि निवडणूक तयारी याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत हा मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.
वाई नगरपालिकेतील पराभवाबद्दल बोलताना ना.मकरंद पाटील म्हणाले की वाई मधील नागरिकांनी मागील वेळी सुद्धा नगरपालिकेची सत्ता आपल्याला दिली न्हवती.पण त्या पराभवाने या निवडणुकीत काहीच फरक पडणार नाही.आगामी निवडणुकीत विजय हा आपलाच असेल.











