निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
येऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुईंज पंचायत समिती गणात रणशिंग फुकले गेले असून गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने लाडक्या बहिणींनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केले आहेत. त्यामुळे भुईंज पंचायत समिती गणात महिलाराज पाहायला मिळणार असून यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुरभीताई भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ॲड. शितल वारागडे, कोमल जाधव या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान खरी लढत डॉ सुरभीताई भोसले व ॲड. शितल वारागडे या दोन रणरागिणी मध्ये चुरशीचा मुकाबला होणार असल्याने विजयाची माळ मतदार कोणाच्या गळ्यात घालणार? अशी चर्चा सध्या भुईंज परिसरात रंगू लागली आहे. नवीन आरक्षणानुसार भुईंज पंचायत समिती गणात महिला उमेदवाराचे वर्चस्व राहणार आहे. यात महिलांचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे. या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकारणात मोठा बदल घडून आला असून निवडणुकीचे मैदान कोण ? मारणार या चर्चेला उधाण आले आहे. भुईज पंचायत समितीत गणातील असणाऱ्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. आरक्षणामुळे प्रत्यक्ष उमेदवार महिला असल्या तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत पुरुषांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पत्नीसाठी पतीची, बहिणीसाठी भावांची, मुलीसाठी वडिलांची धावपळ सध्या सुरू असून गावोगावी बैठकांचा सपाटा, गुप्त चर्चा, रणनीती आखण्याचे काम जोरात सुरू आहे. एकीकडे महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळत असताना दुसरीकडे पारंपारिक राजकारणाच्या चौकटी मोडल्या जात आहेत. केवळ उमेदवारी मिळवायची नव्हे तर सत्तेचे गणित आपल्या बाजूने कसे येईल यासाठी मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भुईंज गणातील सुज्ञ मतदार विजयाचे दान कोणाच्या पदरात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- (चौकट)- *दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित*- भुईंज पंचायत समिती गणामधील दोन्ही महीला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. भाजपा मधून निवडणूक लढणाऱ्या उमेदवार सुरभीताई भोसले या उच्चशिक्षित असून त्या डॉक्टर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवार असलेल्या शितल वारागडे या वकील आहेत. त्यामुळे भुईंज गणातील दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित असल्याने गणाचा विकास निश्चितच होईल यात तिळमात्र शंका नाही.











