निरंजना न्यूज़ नेटवर्क – सचिन इथापे
भुईंज, दि.२६ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवा भाऊ कृषी माऊली सोहळा’ खोलवडी (ता. वाई) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या विशेष उपक्रमाअंतर्गत उपस्थित महिलांना बी, बियाणे, खत, खुरपे, टप वाटप करण्यात आले. शेती उत्पन्न वाढीसाठी आणि महिलांना कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुरभीताई भोसले-चव्हाण, युवा नेते गजानन भोसले, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष शुभदा महाबळेश्वरकर, पूनम बाबर, विशाल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुरभीताई भोसले-चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध कृषी व महिला सक्षमीकरण योजनांची माहिती दिली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तुम्ही सर्व महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. तुम्ही कधीही हाक मारा तुमच्यासाठी सदैव तत्पर राहाणार असल्याचे डॉ सुरभीताई भोसले यांनी सांगितले. यावेळी खोलवडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुरभीताई भोसले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. वाई तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनम बाबर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शुभदा महाबळेश्वरकर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी निखिल रायकर व सुवर्णा थोरात यांनी महिलांना कृषी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती देत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच तानाजी जगताप, श्रीधर जगताप, महेश जगताप, हेमंत बाबर, राहूल काळे, नम्रता पोळ, कांबळे मॅडम उपस्थित होते.
या कार्यक्रमास गावातील महिलांसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांचे आभार अमर कांबळे यांनी मानले.











