निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना मदतीनंतर शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम
सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे उडतरे (ता. वाई) येथे लवकरच सर्व सोयी-सुविधांनी युक्त अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, या कार्यात दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी बाबर यांनी केले आहे.
शिवप्रेरणा प्रतिष्ठानची स्थापना उडतरे येथे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आली असून, स्थापनेपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शिक्षण, सामाजिक मदत, युवकांना प्रोत्साहन आणि गरजू कुटुंबांना आधार देण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. अलिकडेच प्रतिष्ठानतर्फे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्याच्यात शिक्षण संस्था, सुरू संचालित उडतरे येथील विद्यालयातील शिक्षकवृत्ती परीक्षेत यश मिळविणारे तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे. गावातील एका गरजू महिलेला घर बांधण्यासाठी आवश्यक बांधकाम साहित्य तसेच घरगुती उपयोगासाठी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे संबंधित कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, प्रतिष्ठानच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
आता नव्याने सुरू होणारी अभ्यासिका हा प्रतिष्ठानचा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना घरातील अडचणी किंवा आवश्यक सुविधांच्या अभावामुळे अभ्यासात अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी आवश्यक साहित्य आणि शांत वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी आर्थिक तसेच वस्तुरूपाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष शिवाजी बाबर यांनी केले आहे. समाजाच्या सहकार्याने उभारली जाणारी ही अभ्यासिका भविष्यात अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










