निरंजना न्यूज नेटवर्क
उडतारे दि-१६: वाई तालुका शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदी श्री. हर्षवर्धन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड होऊन परिविक्षाधीन कालावधीत वाई तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
दरम्यान, श्री. मोरे साहेबांची वाई तालुक्यात कायम पदस्थापना व्हावी, यासाठी वाई तालुका शिक्षक संघाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्याकडे शिफारस करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कायम पदस्थापना मिळावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी विशेष शिफारस पत्र देऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे नुकतीच श्री. मोरे यांना वाई तालुका गटशिक्षणाधिकारी पदी कायम पदस्थापना देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर वाई तालुका शिक्षक संघाच्या वतीने श्री. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस दत्तात्रय गोळे, नेते महेंद्र इथापे, भास्कर पोद्दार, सहदेव फणसे, सुशांत मोतलिंग, कार्याध्यक्ष विशाल जरंडे, राहुल हावरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल माने, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, फुलचंद महांगडे, किरण पवार, ज्ञानेश्वर धायगुडे, नवनाथ भांगरे आदी उपस्थित होते.
श्री. मोरे यांच्या कायम पदस्थापनेमुळे वाई तालुक्यातील शिक्षकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.











