निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम दुध व्यवसायावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दुधाळ जनावरे कमी दूध देत असून याचा फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले, बंधारे, तलाव, विहिरी ओसंडून वाहत आहेत. गत मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. अक्षरशा : थंडीमुळे मानवा प्रमाणेच जनावरे सुद्धा गारठून गेली आहेत. परिणामी जनावरांच्या दुधाच्या उत्पादनावर थंडीचा परिणाम होत आहे. दुधाच्या उत्पादनात मागील काही दिवसांपासून प्रचंड घट होत असून २० ते २५% पर्यंत उत्पादन घसरल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. थंडीमुळे दुभत्या गाई, म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम जाणवत आहे. परिणामी, सध्या दहा लिटर दुधा मागे दोन ते तीन लिटर चा फरक पडत असल्याचे दूध उत्पादक शेतकरी सांगत आहेत. दुधात घट तसेच पशुखाद्य महागाईमुळे पशुपालक अडचणीत सापडले आहेत. आधीच पशुधन सांभाळणे अवघड झाले असताना अनेकदा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. गेल्या काही दिवसापासून थंडीचा पुन्हा जोर वाढला आहे. ग्रामीण भागात शेतीला पूरक असलेला दूध व्यवसाय शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला पाठबळ देत आहेत. मात्र, निसर्गाचा लहरी पण आणि शासनाच्या दुर्लक्ष मुळे सध्या पशुपालक सर्व बाजूने अडचणीत येत आहेत. पशुखाद्या चे वाढलेले भाव, वाहतूक यामुळे दूध उत्पादक पशुपालक हवालदिल झाले आहेत. थंडीचा परिणाम चांगला जाणवत असल्याने दुखत्या जनावरांच्या दुधात घट जाणवत आहे. अगोदरच दुधाला भाव नाही पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असताना आता दुधात थंडीमुळे घट येत असल्याचा फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यात अनेक दिवसांपासून वातावरणातील किमान तापमानात घट कायम राहिलेली आहे. वाई तालुक्यातील विशेषता नदीकाठच्या भागात थंडीचा कडाका कायमच आहे. त्याचा परिणाम विशेषता शेतकरी बांधवांच्या दुभत्या पशुधना वर होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाचा चरितार्थ नानाविध जातीच्या दुभत्या गायी, म्हशी, शेळ्यांचा दुग्ध व्यवसाया वरच चालतो. वाढत्या गारठ्याने दूध उत्पादनात कमालीची घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या वातावरणात असणाऱ्या गारठ्याने दुभत्या म्हशी, गाई, शेळ्या वारंवार आजारी पडत आहेत. विशेषता गाईं, म्हशीचीं वासरे, शेळ्यांची लहान पिल्ले गारठा सहन न झाल्याने आजारी पडत आहेत. परिणामी थंड हवामानाचा दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
थंडीचा फटका दुधाळ जनावरांना बसत असल्याने जनावरांना थंडीचा जास्त फटका बसू नये आणि याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. या जनावरांना शेकोटीची उब देणे, जनावरांच्या अंगावर बारदाण्या ची झुल पांगरणे, यासह त्यांच्या आहारातही मोठा बदल करत दूध उत्पादन घटू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
*दूध उत्पादनावर परिणाम* — वाढत्या थंडीचा सामना जनावरांना देखील करावा लागत आहे. या वाढत्या थंडीमध्ये दुभत्या जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात, तसेच गाई म्हशींच्या शरीरातून दूध निघण्याच्या जागेवर वाढत्या थंडीमुळे तडे पडून रक्तस्राव त्याच बरोबर पू बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे दुभत्या जनावरांची दूध देण्याची प्रक्रिया मंदावत असून त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होत आहे.











