निरंजना न्यूज़ नेटवर्क
भुईंज, दि. ३० प्रतिनिधी :
सुरूर, ता. वाई येथे एका समाजातील अल्पवयीन मुलीचा त्याच समाजातील युवकाशी विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सतर्कता दाखवत होणारा बालविवाह रोखला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचे बालविवाहापासून संरक्षण झाले.
सुरूर परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती भुईंज पोलीस ठाण्याला मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिंदे, सुरज शिंदे, बीट अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, महिला पोलीस हवालदार पुनम बांगर तसेच महिला पोलीस पाटील निर्मला पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच पालकांचे समुपदेशन व प्रबोधन करून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे होणारा विवाह थांबविण्यात आला.
दरम्यान, या कारवाईची माहिती सुरूर परिसरात पसरताच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले. अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा वाचवण्यासाठी भुईंज पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बाल विवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे परिसरातून स्वागत होत आहे.












