निरंजना न्यूज नेटवर्क
भुईज पोलीस ठाणे हद्दीत काही वाहनचालकांकडून बुलेट मोटारसायकलींना कंपनीचा मूळ सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या आवाजाचे (इंदोर/पंजाब प्रकारचे) सायलेन्सर बसवून गावामध्ये फिरत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर तक्रारींची दखल घेऊन भुईज पोलीस ठाण्याकडून विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार एकूण 11 बुलेट मोटारसायकली ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. संबंधित वाहनांवर बसवलेले कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर काढून त्याठिकाणी कंपनीचे मूळ सायलेन्सर बसविण्यात आले.
तसेच संबंधित वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून एकूण रु. 14,500/- दंड आकारण्यात आला आहे.
ही कारवाई भुईज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पतंगराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरज शिंदे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पो. ना. सुशांत धुमाळ, पो. काँ. रोहन चव्हाण आणि पो. काँ. अजित पवार यांनी केली.
भुईज पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे बेकायदेशीर सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणारी बुलेट मोटारसायकल आढळल्यास तात्काळ भुईज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल.










