उडतरे दि-१६ – उत्तरा जेष्ठ नागरिक संघ, उडतरे (ता. वाई, जि. सातारा) यांच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दशकपूर्ती सोहळा व १०० वी मासिक सभा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राची शाही लोकधारा हा मराठी लोकगीतांचा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी शाहीर श्री. प्रवीण फणसे (पोलीस निरीक्षक, मुंबई) व सहकारी उपस्थित होते. त्यांच्या दमदार शाहीरीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि लोकगीतांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला.
संघाच्या कार्याचा आढावा घेताना संस्थापक अध्यक्ष श्री. प्रवीण ज्ञानेश्वर बाबर यांनी गेल्या दहा वर्षांतील उपक्रमांची माहिती दिली. जेष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, आरोग्यविषयक मार्गदर्शन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, तसेच विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना सहलींचे आयोजन अशा अनेक उपक्रमांमुळे संघाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संघामार्फत नियमित मासिक सभा घेण्यात येतात. आजपर्यंत १०० मासिक सभा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. सभांमध्ये वाढदिवस साजरे करणे, मार्गदर्शनपर व्याख्याने, तसेच सामाजिक विषयांवर चर्चा केली जाते.
आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन, फिजिओथेरपी शिबिरे अशा उपक्रमांद्वारे जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. याशिवाय ‘वैद्यकीय निवारा शेड’ उभारणीसाठी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा निधी उभारून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणीपुरवठा, कोरोना काळात गरजू नागरिकांना धान्य व किराणा वाटप, मास्क व सॅनिटायझर वितरण अशा समाजोपयोगी कामांमुळे संघाने समाजात आपले स्थान बळकट केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. पुढील काळातही जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आणि समाजोपयोगी कार्यासाठी संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दशकपूर्ती सोहळ्यामुळे उडतरे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जि.प.सदस्य दिलीप बाबर,प्रताप पवार चिटणीस, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस,
निवृत्ती आप्पा बाबर,बाळासाहेब उर्फ डॅडी वाघ,सुधाकर गायकवाड,डॉ मोहन सोनावणे,उडतरे गावाच्या सरपंच अर्चना पवार,उपसरपंच प्रकाश पवार,शिवाजीराव बाबर ,प्रवीण पवार,नरेंद्र बाबर,चंद्रकांत निंबाळकर
डॉ राजकुमार नवले ,प्रकाश काटवटे ,सुरेश पवार,संजय पवार ,प्रकाश बाबर,जगन्नाथ पवार,नारायण जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी
प्रास्ताविक प्रवीण बाबर ,स्वागत सर्जेराव जाधव आणि आभार
दिलीपदादा जगताप यांनी केले.
“जेष्ठ नागरिकांचा सन्मान हीच खरी संस्कृती” – जि.प. सदस्य दिलीप बाबरउत्तरा जेष्ठ नागरिक संघाच्या दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना जि.प. सदस्य श्री. दिलीप ज्ञानोबा बाबर यांनी संघाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. गेल्या दहा वर्षांत संघाने जेष्ठ नागरिकांना एकत्र आणून सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांद्वारे आदर्श कार्य उभारले आहे, असे त्यांनी नमूद केले.
“जेष्ठ नागरिकांचा अनुभव हा गावाच्या विकासासाठी दिशादर्शक असतो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच समाजाची प्रगती होते,” असे सांगत त्यांनी जेष्ठांचा सन्मान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
भविष्यात संघाच्या सर्व उपक्रमांना आपले पूर्ण सहकार्य राहील, तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.













