लाडक्या बहिणी, विधवा, घटस्फोटीत महिलांची ई केवायसी साठी कसरत ; उरले फक्त दोन दिवस. लाडक्या बहिणी हप्त्याच्या प्रतिक्षेत.


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी ची मुदत संपायला ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने अवघे दोन दिवस बाकी आहेत. सुरुवातीला सर्वर डाउन असल्याने केवायसी करताना अनेक अडचणी येत होत्या. आता हा अडथळा दूर झाला असला तरी विधवा, घटस्फोटीत महिलांना कागदपत्रासाठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन केवायसी अध्याप न झालेल्या महिलांचे अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी धावपळ सुरू आहे. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ची मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. ई केवायसी फॉर्म ऑनलाईन भरायचा होता. हा फॉर्म भरण्यासाठी महिला महा-ई-सेवा केंद्रात जात असल्या तरी सर्वर डाऊन असल्याने फॉर्म भरता येत नव्हते केवायसी करण्यासाठी महिला सलग आठ दिवस फेऱ्या मारत होत्या. त्यातही दहा पैकी एका महिलेची ऑनलाइन केवायसी होत होती. आता डिसेंबर महिना संपत आला तरी ५० टक्के लाभार्थी महिलांना फॉर्म भरता आलेला नाही. अखेर वर्षाची मुदत संपायला शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. सरकारने ही प्रक्रिया ऑफलाईन केली. अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सेविकांवर पुन्हा एकदा कामाचा ताण वाढला आहे.

*कागदपत्रे नसल्याने अडचण* ई केवायसी करण्यासाठी महिलांना वडील किंवा पतीचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. परंतु अनेक विधवा महिलांनी पतीच्या मृत्यूचे दाखले काढले नसल्याने त्यांना फॉर्म भरता येत नाही. या महिला मृत्यूचे दाखले काढण्यासाठी धडपडत आहेत. अशीच अवस्था घटस्फोटीत महिलांची आहे. न्यायालयात केस सुरू असून अद्याप घटस्फोट मिळालेला नाही. अशा अनेक महिला आहेत. त्यामुळे कागदपत्रे नसल्याने त्यांचेही फॉर्म भरताना अडचणी निर्माण होत आहेत.

*लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा*– लाडक्या बहिणींच्या योजनेचा हप्ता ऑक्टोबर पासून मिळालेला नाही. नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर हप्ता मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला आता ई केवायसी चे ग्रहण लागले आहे. ई केवायसी केलेल्या महिलांनाही हप्ता मिळालेला नाही. महिलांना हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!