वाई MIDC मधील मूर्ती कारखान्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

वाई, दि. ०२ : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वाई MIDC परिसरातील प्लॉट क्रमांक १८ येथील गणेशमूर्ती कारखान्याला मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे साहित्य, तयार मूर्ती तसेच गौरी-गणपतीच्या मूर्ती आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बावळेकर कुटुंबीयांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यातील मोठ्या प्रमाणावरील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करून त्यावर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नुकसानाची तीव्रता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून एकूण पाच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री दहा वाजल्यापासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग पूर्णपणे विझवताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
घटनास्थळी वाई पोलिस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी तसेच पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, नगरसेवक विजय ढेकाणे, सुशील खरात, विजय पाटणे, चरण गायकवाड, प्रशांत डोंगरे यांच्यासह बोपर्डी येथील युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग हे मूर्ती निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून, या कारखान्यात तयार होणाऱ्या गणेशमूर्ती देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर पाठविल्या जातात. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच ही दुर्घटना घडल्याने कारखानदारांसह मूर्ती खरेदीदार आणि गणेशभक्तांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

वाई MIDC मध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

वाई MIDC परिसरात छोट्या-मोठ्या अनेक कंपन्या आणि उद्योग कार्यरत असताना MIDC प्रशासनाकडे स्वतःचा एकही अग्निशामक बंब नसल्याची धक्कादायक बाब या दुर्घटनेमुळे समोर आली आहे. एखाद्या उद्योगाला आग लागल्यानंतर वाईसह पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून अग्निशामक बंब मागवावे लागत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रणात आणण्यासाठी लागणारा वेळ वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, MIDC परिसरातील काही व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करून शेड उभारल्याची चर्चा असून, नियमबाह्य बांधकामांवर MIDC प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. उद्योगांची संख्या आणि परिसरातील जोखीम लक्षात घेता MIDC मध्ये स्वतंत्र अग्निशमन व्यवस्था, अग्निसुरक्षा तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने अधोरेखित झाली आहे.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!