निरंजना न्यूज नेटवर्क
सातारा दि. 2(प्रतिनिधी)- किल्ले अजिंक्यता-यावर सोमवार दि. 2 रोजी एक व्यक्ती साधारण २०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा माहिती मिळताच साताऱ्यातील ‘शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स’ची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली असून सध्या युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून पाय घसरून थेट खोल दरीत कोसळली. या घटनेचा कॉल मिळताच ट्रेकर्सच्या टीमने आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली. दरीची खोली आणि ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे, मात्र ट्रेकर्सचे पथक दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचले. तो व्यक्ती जखमी अवस्थेत बेशुद्ध मिळून आला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले.











