निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
गतवर्षी वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदाचा रब्बी हंगाम जोमात बहरला आहे. तालुक्यात वाढलेल्या कडाक्याच्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना लाभ होत असून पिकांमध्ये जोमदार वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रब्बी हंगामातील पिकांची वाढ एकंदर समाधानकारक झाली आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजरी लावली होती. त्यामुळे जमिनीत मुबलक ओलावा होता. त्यातच आता वाढत चाललेल्या थंडीने रब्बी पिकांना उत्तम वाढीसाठी योग्य पोषक वातावरण लाभत आहे. हवामानाचा ताळमेळ पाहता यंदाचा रब्बी हंगाम उत्पादन वाढीसाठी योग्य असून यावर्षी तालुक्यात एकूण एवढ्या हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक हेक्टर हरभरा पेरणी करण्यात आली तर हेक्टर ज्वारी हेक्टर गहू आधी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. सध्या पोषक वातावरण असल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांची वाढ एकसमान समाधानकारक होताना दिसत आहे. तालुक्यात ज्वारी, हरभरा, गहू पिकांची वाढ लक्षवेधी आहे. हरभरा, ज्वारी, गहू वाढीसाठी थंडी अत्यंत आवश्यक मानली जाते. त्यामुळे असणाऱ्या थंडीमध्ये हरभरा व गहू, ज्वारी पिकांची वाढ चांगली झाली आहे. पिकांच्या पानांची तजेलदारपणा व रोपांची ताकद उत्तम अवस्थेत दिसून येत आहे. ज्वारीच्या पिकांना चांगला वेग आला असून पानावरील रोगराईचे प्रमाण अत्यंत कमी आहे. काही भागात हरभरा पिकात फुलोऱ्याची प्रक्रिया जोमाने सुरू असून पिकांची स्थिती निरोगी आहे. दरम्यान नदीकाठच्या शेत जमिनीत योग्य पद्धतीने व्यवस्थित सिंचन होत असल्याने रब्बी पिकांना जमिनीतील साचलेला अतिरिक्त ओलावाही मिळत आहे.
सध्या रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून थंडीचे वाढते प्रमाण हवेतला गारवा आणि जमिनीत असलेला ओलावा यामुळे परिसरातील पिके जोमात भरत आहेत. सध्या हरभरा, गहू, ज्वारी पिके बहरले आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. विलास चव्हाण शेतकरी किकली. ता. वाई
वाई तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यापासून ते पेरणी खत व्यवस्थापन, पीक नियंत्रण, कीड नियंत्रण व प्रतिबंधात्मक फवारणी बाबत वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकरी नियमित निरीक्षण करून कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करत असल्याने पिकांवर रोगाचा धोका कमी झाला आहे. थंडीचे वातावरण आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तालुका कृषी अधिकारी. हरीश चंद्र धुमाळ.













