भुईंज परिसरात गणेशोत्सवात डॉल्बीचा ठोक चुकणार! परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे यांचा कडक इशारा; सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्याचे आवाहन


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांची विशेष बैठक पार पडली. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांतता टिकून राहावी यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यंदा भुईंज व परिसरात DJ आणि डॉल्बी सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूनम झगडे यांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात डॉल्बीचा ठोक चुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीत गणेश मंडळांसाठी महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे:
* मंडप उभारणी तसेच विविध कार्यक्रमांसाठी पोलीस ठाणे व स्थानिक प्रशासनाची परवानगी (NOC) घेणे बंधनकारक आहे.
* मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये. रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवावा.
* अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रींच्या मूर्तीजवळ मंडळाच्या कोणत्या ना कोणत्या कार्यकर्त्यांनी २४ तास उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच मंडप परिसरात CCTV कॅमेरे लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.
* आगीच्या दुर्घटनेपासून संरक्षणासाठी प्रत्येक मंडपात अग्निशामक सिलिंडर आणि पाण्याची योग्य सोय ठेवावी.
* नियम डावलून डॉल्बी किंवा उच्च आवाजात ध्वनिक्षेपक वाजवल्यास पोलीस कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. यामध्ये १ महिना ते ३ महिने तुरुंगवास आणि ₹१,००० ते ₹१,००,००० पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
डॉल्बीऐवजी सांस्कृतीक उपक्रमांचा जागर करा!
ध्वनिप्रदूषण आणि अनावश्यक खर्च टाळून मंडळांनी सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन भुईंज पोलिसांनी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
१. सांस्कृतिक व कला मंच: स्थानिक कलाकारांना संधी देणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भजने, लोककला व नाटकांचे आयोजन करावे.
२. आरोग्य व रक्तदान शिबीर: नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी, नेत्रतपासणी व रक्तदान शिबिरांचे नियोजन करावे.
३. शालेय स्पर्धा: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळांच्या सहकार्याने चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घ्याव्यात.
४. पर्यावरणपूरक उपक्रम व वृक्षारोपण: ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करत वृक्षारोपण मोहीम राबवावी व झाडांचे वाटप करावे.
प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून भुईंज परिसरातील सर्व मंडळांनी गणेशोत्सव शिस्तबद्ध, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच ध्वनीप्रदूषण विरहित आणि पर्यावरण पुरक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना भुईंज पोलिस स्टेशन तर्फे गणराया अवार्ड आणि प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
यावेळी भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे ,डॉ.प्रिया जगदाळे,भुईंज महावितरण अभियंता संतोष पाटील ,भुईंज चे लोकनियुक्त सरपंच विजय वेळे,भुईंज पोलिस स्टेशन चे अधिकारी ,कर्मचारी यासह सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी,तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी ,पोलिस पाटील उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित जयवंत पिसाळ यांनी केले आणि आभार स.पो.नि पृथ्वीराज ताटे यांनी केले.


118
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!