भुईंज सिटी सर्वे कार्यालयाचा ‘मनमानी कारभार’; नागरिकांची कागदपत्रांसाठी ससेहोलपट!


निरंजना न्यूज नेटवर्क –

भुईंज प्रतिनिधी – सचिन इथापे 

आठवड्यातून केवळ बुधवारी कार्यालय सुरू; जमिनीच्या कामांसाठी नागरिकांच्या वारंवार फेऱ्या

आठवड्यात किमान तीन दिवस कार्यालय सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – उपसरपंच शुभम पवार यांचा इशारा ;

भुईंज येथील सिटी सर्वे कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, आठवड्यातून केवळ बुधवारी कार्यालय सुरू राहत असल्याने नागरिकांची कागदपत्रांसाठी मोठी ससेहोलपट होत आहे. महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित नोंदी, मिळकत पत्रिका, फेरफार, नकाशे तसेच विविध शासकीय कामांसाठी सिटी सर्वे कार्यालयातील कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कार्यालय आठवड्यातून केवळ एक दिवस सुरू राहत असल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.
ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपली कामे घेऊन भुईंज येथे येतात. कार्यालयातील कामकाजाच्या मर्यादित दिवसांमुळे काही नागरिकांना काम पूर्ण न करताच परतावे लागते, तर काहींना पुढील बुधवारी पुन्हा कार्यालय गाठावे लागते. परिणामी नागरिकांचा अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
भुईंज हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून, सिटी सर्वे कार्यालयाशी संबंधित कामांसाठी आजूबाजूच्या नागरिकांचीही येथे ये-जा असते. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता आठवड्यात किमान तीन दिवस नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासकीय कार्यालयातून नागरिकांना वेळेत आणि सुलभ सेवा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मर्यादित दिवसांच्या कामकाजामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
चौकट- *मनमानी कारभाराला लगाम घाला; अन्यथा आंदोलन*
याबाबत भुईंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सिटी सर्वे कार्यालयाचा कारभार नियमित करावा आणि आठवड्यात किमान तीन दिवस कार्यालय सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“नागरिकांना कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारायला लावणे योग्य नाही. कार्यालयाचा कारभार तातडीने सुरळीत करून नागरिकांना नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा उपसरपंच शुभम पवार यांनी दिला आहे.

चौकट -*वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष*-
भुईंज सिटी सर्वे कार्यालयाच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या या प्रश्नावर वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आठवड्यातून एक दिवस सुरू असलेले कार्यालय किमान तीन दिवस सुरू करून नागरिकांची फरफट थांबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

फोटो-ai जनरेटेड काल्पनिक


118
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!