निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
वाई दि. १९ : “सामाजिक भावनेतून सुरू केलेला कोणताही उपक्रम हा शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. डॉ. महेश मेणबुदले यांनी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य केवळ मानले नाही, तर ते कृतीत उतरवून स्पंदन हॉस्पिटलचा लौकिक वाढवला आहे. त्यांनी सुरू केलेले ‘अश्विना डायलिसिस सेंटर’ हे परिसरातील डायलिसिस रुग्णांसाठी मोठा आधारवड ठरेल,” असा विश्वास वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केला.
वाई येथे ‘अश्विना डायलिसिस सेंटर’च्या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना महादेव शिवाचार्य महाराज म्हणाले की, “डॉ. मेणबुदले यांनी ‘दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आजवर अनेक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जो व्यक्ती माणुसकीचा धर्म जपत कार्य करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. वैद्यकीय क्षेत्रात आज अशा सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे.”
यावेळी सेंटरचे संचालक डॉ. महेश मेणबुदले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “डायलिसिसच्या रुग्णांना उपचारासाठी होणारा मोठा खर्च परवडत नाही. हाच विचार करून आम्ही अत्यंत माफक आणि परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हे सेंटर सुरू केले आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
या कार्यक्रमास पत्रकार विकास जाधव, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. रूपाली पवार, डॉ. स्नेहल शिंगटे, डॉ. नाज मकानदार, डॉ. आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ आप्पा राऊत, विशाल गाडे यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.











